*शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी ई पिक पाहणी शेतकरी स्तरावर करण्यात यावी शेतकरी संघटनेचे निवेदन*
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
: सध्या ई-पिक पाहणीची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन नियुक्त सहाय्यकांच्या माध्यमातून नोंदणी करून घ्यावी लागत आहे. या प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांना अनावश्यक आर्थिक खर्च सहन करावा लागत असून, ई-पिक पाहणीच्या नोंदणीसाठी काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारीदेखील प्राप्त होत असल्याचे शेतकरी संघटनेने म्हटले आहे.
शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे स्वतःच्या मोबाईलद्वारे ई-पिक पाहणीची नोंदणी करण्याचा अधिकार पुन्हा देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सुधीर सोनवणे यांना देण्यात आले.
शेतकरी स्वतः आपल्या पिकांची नोंद करू शकत असल्यास त्यांचा अनावश्यक आर्थिक खर्च टळेल. तसेच नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि शेतकरीहिताची होईल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
या संदर्भात प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ई-पिक पाहणीची नोंदणी शेतकरी स्तरावर पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अखिलेश पाटील यांनी केली आहे.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष वाल्मीक लोखंडे व धनराज पाटील, कार्याध्यक्ष सतिश पाटील, सचिव डॉ. योगेश गोसावी, युवा अध्यक्ष लिलाधर पाटील, युवा उपाध्यक्ष सागर पाटील, सरचिटणीस समाधान पाटील, सरदारसिंग पाटील, रामकृष्ण माळी व नरेंद्र पाटील, संघटक संजय खैरनार व संजय पाटील, चिटणीस योगेश शालिक पाटील, युवा सचिव योगेश खुशाल पाटील तसेच युवा संघटक विकी पाटील उपस्थित होते.