वाघळी (ता चाळीसगाव)ता 8:
सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत येथील यशवंत पब्लिक स्कूल मध्ये “व्यसनमुक्त जीवन आणि त्याचे फायदे” या विषयावर प्रेरणादायी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.हा कार्यक्रम ग्रामीण पोलीस स्टेशन,चाळीसगाव आणि ब्रह्माकुमारीज फाउंडेशन, कजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला ग्रामीण पोलीस स्टेशन, चाळीसगावचे पोलीस उप निरीक्षक विजय माळी तसेच ब्रह्माकुमारीज फाउंडेशन, कजगावच्या बीके चंद्रकला मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच निरोगी, शिस्तबद्ध, संस्कारक्षम आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याबाबत अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी या जनजागृती सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा दृढ संकल्प यावेळी केला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष परमानंद यशवंत सूर्यवंशी, मुख्याध्यापिका सौ. जयश्री सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले.,यावेळी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.