भडगाव (जि. जळगाव):
भडगाव तालुक्यातील कोठली गावचे सुपुत्र, सेवानिवृत्त सैनिक व निःस्वार्थ समाजसेवक समाधान भाऊ पाटील यांना वैचारिक स्वराज्य या आध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीच्या वतीने “सामाजिक कार्य भूषण – २०२६” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फरकांडे (ता. एरंडोल) येथील हरिनाम सप्ताहात सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशसेवेचा गौरवशाली कालखंड पूर्ण केल्यानंतरही समाजाशी असलेली आपली नाळ न तोडता समाधान भाऊ पाटील यांनी गावपातळीवर विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. युवकांना योग्य मार्गदर्शन, राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण करणे, सामाजिक सलोखा जपणे तसेच समाजहितासाठी सातत्याने कार्य करणे, हे त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे.
त्यांच्या या दीर्घकालीन व निःस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत वैचारिक स्वराज्य संस्थेच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार वितरण ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज (१२ वे वंशज) यांच्या पावन हस्ते पार पडले.
वैचारिक स्वराज्य ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आध्यात्मिकतेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन, सांस्कृतिक जाणीव आणि मानवी मूल्यांचे संवर्धन करण्याचे कार्य करत आहे. समाजासाठी निःस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रेरणा देणे, हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
समाधान भाऊ पाटील यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या देशसेवेबरोबरच समाजसेवेच्या दीर्घ परंपरेचा सन्मान असून, तो समाजातील नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
---