Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


ज्वारीची लागवड घटल्याने गुरांच्या चाऱ्यासाठी मक्याचा उपयोग

ज्वारीचा कडबा दुर्मिळ ...  ज्वारी लागवडीचे क्षेत्र  घटले--
मका लागवडीत मोठी वाढ... कुट्टीसाठी  मक्याच्या कडब्याचा होतो वापर ....
शिंदी, ता. भुसावळ (वार्ताहर)-- निसर्गातील बदलत्या हवामानाचा परिणाम शेती शिवारात दिसून येत आहे. पारंपारिक ज्वारी ,बाजरी या पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांचा ओढा मका या पिकाकडे वाढला असून मक्याच्या वाढत्या लागवड क्षेत्रामुळे त्याचा परिणाम थेट पशुधनाला लागणाऱ्या कडब्यावर सुद्धा झाल्याचे दिसून येते. सध्या मका कुट्टी ही लहान ट्रक मध्ये दहा ते बारा हजारात उपलब्ध होते. ज्वारी कडब्याचा चारा ज्वारी पेरणी अभावी शिंदी परिसरात दिसूनही येत नसल्याचे सांगण्यात आले . चाऱ्याचा भाव व वाहतुकीच्या दरातील वाढ त्यामुळे पशुपालकांचे अर्थकारण अडचणीत येत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून निसर्गाच्या कालचक्रात बदल झाले असून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ सदृश्य परिस्थिती, वादळी वारे यामुळे शेतकरी ज्वारी- बाजरी या ऐवजी मका या पिकाकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. ज्वारी बाजरीच्या तुलनेत मका हे पीक तग धरणारे समजले जाते. हिरवा सकस चारा सहज उपलब्ध होतो. यांत्रिकीकरणाची सुविधा व बाजारपेठेत मक्याला होणारी मागणी या कारणांमुळे मक्याची लागवड परिसरात वाढत असल्याचे दिसून येते. सुधारित बियाणे, ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या  वापरामुळे उत्पादनात सातत्य राखले जात असल्याचे दिसून येते. 
...... ज्वारी व बाजरीचे लागवड क्षेत्र घटल्याने परिसरात ज्वारी कडबा दिसूनही येत नाही गुराढोरांसाठी चारा व कुट्टी म्हणून मक्याच्या चाऱ्याच्या वापराला शेतकरी पसंती देतात असे दिलीप सुभाष पाटील, अर्जुन धांडे, भूषण पुनमसिंग राजपूत या शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.
 काही वर्षांपूर्वी ज्वारी- बाजरीची पेरणी मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र उत्पादनातील जोखीम तसेच निसर्गाचा लहरीपणा हवामानाची अनिश्चितता आणि वाढता खर्च यापेक्षा अधिक उत्पादन आणि जोखीम कमी यामुळे खरीप व रब्बी दोन्ही हंगामात मका लागवडीला शेतकरी  पसंती देत असतात.
----- ज्वारी व बाजरीच्या पिकांना बदलत्या हवामान वातावरणाचा फटका बसत असतो .कापणी व मळणी प्रक्रिया खर्चीक आणि पक्षांचाही त्रास होतो व उत्पादन घटते त्यामानाने मका काही प्रमाणात सुरक्षित मानला जातो.
------" दुधाळ गुरांसाठी कडबा आवश्यक असतो. मात्र कडबा चाऱ्याचे वाढते दर परवडत नसल्याने मक्याचा चारा व कुट्टी याचा मोठ्या प्रमाणावर वापर सध्या करण्यात येत असतो. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी मका लागवडीकडे वळले आहेत.
-------------------------------------
---- मका उत्पादनाशी संबंधित मोठ्या स्टार्च प्रकल्पाची गरज.... बोदवड-- जामनेर भागात अनेक वर्षापूर्वी स्टार्च प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली होती. त्या माध्यमातून परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र जिल्ह्यातील त्यावेळचा महत्त्वाकांक्षी महत्त्वाचा प्रकल्प हा बंद पडला. परिसरात आज होणारे मक्याचे प्रचंड उत्पादन पाहता अशा प्रकल्पाला चालना मिळाल्यास नक्कीच परिसरातील शेतकऱ्यांच्या मका उत्पादनाला भाव मिळेल. रोजगाराची एक नवीन संधी या निमित्ताने तरुणांना उपलब्ध होईल.
-- सौ. निलिमा गिरीश नेमाडे. सामाजिक कार्यकर्त्या, शिंदी ता. भुसावळ.
-----------------------------------------
------- मका पिकाचा वाळलेला चारा जनावरे आवडीने खातात . त्यामुळे मका पिकाचे वैरण शेतकरी गुराढोरांना देत असतात. मका पिकाचा हिरवा चारा जनावरांना दिल्यामुळे दुधामध्ये वाढ होते. मका पीक हे नत्र, स्फुरद, पालाश या खतांना पूर्णपणे प्रतिसाद देते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. दोन्ही हंगामात येणारे सोयीचे पीक म्हणून या भागातील शेतकरी मका या पिकाकडे वळल्याचे दिसून येते.
.... एम. एस. मिटके.
 सहाय्यक कृषी अधिकारी- शिंदी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.