भुसावळ शहरात तरुणाचा मध्यरात्री खुन
नेब कॉलनीतील घटना
भुसावळ शहरातील भर वस्तीत नेब कॉलनी परिसरात रात्री १ वाजेच्या सुमारास किरकोळ वादातून झालेल्या घटनेत एका तरूणाचा खून करण्यात आल्याने परिसर हादरला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाने हादरले आहे.
ही भयंकर घटना रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास घडली. शहरातल्या आनंद नगर भागाला लागून असलेल्या नेब कॉलनी भागात ही घटना घडली. यात अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२) या तरूणाचा एकाशी किरकोळ वाद झाला.
यातून झालेल्या वादात संशयिताने अनिल यांच्या डोक्यात सिमेंटची कुंडी मारली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र या आधीच सावकारे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटना स्थळ धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक राहूल वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या घटनेच्या संदर्भात बाजार पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
आरोपींना तत्काल अटक करण्याची मागणी अनिल सावकारे यांच्या नातेवाईकांनी केली आहे .