भुसावळ (प्रतिनिधी) – श्रीराम हाऊसिंग सोसायटी येथील रामेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. आता मंदिराचे काम अनेक दानशूर दात्यांच्या सहकार्याने कळस उभारणीपर्यंत पूर्णत्वास आले आहे. त्या निमित्ताने दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता पंचधातू कळसाची भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात कॉलनीतील नागरिकांनी सहपत्नीक पालखी खांद्यावर घेण्याचा बहुमान मिळविला.
टाळ-मृदंगाच्या गजरात व भक्तिमय वातावरणात पालखीतून कळसाची मिरवणूक सोसायटी परिसरातून मार्गस्थ झाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी डोक्यावर कळस घेऊन रामेश्वर महादेवांप्रती आपली श्रद्धा व भक्तीभाव व्यक्त केला. सोसायटीतील मुख्य रस्त्यावर माता-भगिनींनी आकर्षक व सुंदर रांगोळ्या काढून मिरवणुकीचे स्वागत केले.
मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी पालखी व कळसाचे पूजन करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. या कार्यक्रमात सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच श्रीराम मंदिर येथे प्रभू श्रीरामांची सामूहिक आरतीही संपन्न झाली.
सुमारे दोन तास चाललेल्या या मिरवणुकीचा समारोप सायंकाळच्या आरतीने झाला. बालगोपाल, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
महाशिवरात्री निमित्त मंदिरात सकाळी सहा ते आठ या वेळेत मंदिरावर कळसारोहण विधी व पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर भगवान शिवांचे स्तोत्र पठण व विविध पूजाविधींचे आयोजन केले आहे, अशी माहिती श्रीकृष्ण राणे यांनी दिली. भाविकांनी फराळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले .