शिंदी येथील युवा शेतकऱ्यांची भेट.
17 ते 24 जानेवारी दरम्यान बारामती येथे शेतीच्या भविष्याची दिशा दाखवणारे कृषी प्रदर्शन सुरू आहे. सुमारे 170 प्रक्षेत्रावर हे शेतीशी निगडीत व शेतकऱ्यांचा शाश्वत विकास साधण्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे येथील युवा शेतकरी भूषण पुनमसिंग राजपूत यांनी सांगितले.
या कृषी प्रदर्शनात केवळ माहितीच नव्हे तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह आधुनिक तंत्रज्ञान अनुभवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली. शेतकऱ्यांना ए आय सेंसर रोबोटिक्सचा शेतात थेट अनुभव याची प्रत्यक्ष माहिती मिळाली .आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा मार्ग दाखवणारे प्रदर्शन शेतीच्या नव्या युगाची नांदी ठरेल असा विश्वास प्रदर्शनात भेट देणाऱ्या शेतकऱ्यांमधून त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला असे या तरुण शेतकऱ्यांनी सांगितले.
या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी चिनी मका तंत्रज्ञान, ए आय आधारित कांदा व केळी उत्पादन, नेदरलँड मध्ये विकसित 500 ते 600 ग्रॅम वजनाचा लाल कांदा तसेच अमेरिका, इस्राइल, इटली ,जर्मनी, जपान, कोरिया, फ्रान्स, ब्राझील, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशातील अत्याधुनिक ए आय सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहता आले. प्रगत मशिनरी सूक्ष्म सिंचन प्रणाली, सेन्सर सहित उपकरणे ,पॉलिहाऊस, हायड्रोपोनिक भाजीपाला तंत्रज्ञान, स्मार्ट टूल्स यांचे सजीव प्रात्यक्षिक हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण होते.
या प्रदर्शनात खत, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता, सुयोग्य काढणी पश्चात तंत्रज्ञान, उत्पन्नाचा अंदाज, हवामान बदलानुसार पीक पद्धतीचे नियोजन, बाजार भावाचा अंदाज, जमिनीची उत्पादकता, मातीची गुणवत्ता, रासायनिक खतांचा वापर, जमिनीतील सेंसर, ड्रोन, रोबोट व सॅटॅलाइट द्वारे संपूर्ण प्रक्षेत्राचे नियोजन याची माहिती जवळून मिळाली.
नैसर्गिक शेतीतून बनवलेले वालवर्गीय पिके त्यांचे मांडव बांधण्याची पद्धत याचा अभ्यास करता आला.
तसेच वांग्याच्या झाडाला कलम केलेले टोमॅटो अशी विविध प्रकारची माहिती अभ्यासायला मिळाली .
पाणी खत आणि रासायनिक कीटकनाशकांचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चितच गाठू असा विश्वास या प्रदर्शनास भेट दिलेल्या येथील युवा शेतकरी भूषण पुनमसिंग राजपूत, योगेश अशोक पाटील, अमोल चिंधू पाटील, दीपक माणिकसिंग राजपूत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
..... होतकरू शेतकऱ्यांना होणार फायदा.....
गावासह परिसरातील शेती ही कोरडवाहू असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अधिक उत्पन्नाचा प्रत्यक्ष अनुभवातून मार्ग दाखवणाऱ्या या प्रदर्शनास भेट देणे सर्वांनाच शक्य नसले तरी या होतकरू शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. खर्च कमी करून उत्पादन अधिक वाढवण्याचा सल्ला घ्यावा . पारंपारिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
..... सौ. निलिमा गिरीश नेमाडे. सामाजिक कार्यकर्त्या, शिंदी ता . भुसावळ .