स्काऊट-गाईड श्रमसंस्कार शिबिरातून होते स्वच्छता मूल्यवर्धन : श्री. नंदकुमार चौधरी
थोरगव्हाण (ता. रावेर) | दि. २ जानेवारी २०२६ :
दि एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण संचालित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे स्काऊट-गाईड श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन सकाळी १०.४५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या शिबिराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वच्छतेची जाणीव व सामाजिक बांधिलकी निर्माण करणे हा असल्याचे प्रास्ताविकात स्काऊट-गाईड समिती प्रमुख श्री. वाय. जे. कुरकुरे यांनी सांगितले.
श्रमसंस्कार शिबिराचे अध्यक्ष श्री. नंदकुमार चौधरी (शालेय समिती सदस्य) यांच्या शुभहस्ते स्काऊट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी योग शिक्षक श्री. राजेंद्र बाऊस्कर यांनी किशोरवयीन स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्यासाठी योग व प्राणायामाचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. शिबिरात एकूण १६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व वनभोजनाचा आनंद घेतला.
शिबिरादरम्यान स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी संपूर्ण शालेय परिसर व क्रीडांगणाची स्वच्छता करून श्रमप्रतिष्ठा व संघभावनेचे प्रभावी दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. नंदकुमार चौधरी यांनी “स्काऊट-गाईड श्रमसंस्कार शिबिरातून स्वच्छतेचे मूल्यवर्धन होते” असे सांगत विद्यार्थ्यांना श्रमसंस्काराचे महत्त्व, स्वच्छतेचे सामाजिक फायदे तसेच शिस्त व संघभावनेचे मूल्य समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रमदानातून सकारात्मक संदेश दिला.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. उमाकांत बाऊस्कर, संचालक श्री. चंद्रकांत पाटील, संचालक श्री. रविंद्र चौधरी व मुख्याध्यापक श्री. डी. के. पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून शिबिरास शुभेच्छा दिल्या तसेच युनिटनिहाय श्रमदानाची विभागणी जाहीर केली.
शिबिरासाठी सर्वांसाठी व्हेज पुलाव व गुळाचा शिरा हा भोजन मेनू उपाध्यक्ष मा. श्री. उमाकांत बाऊस्कर व श्री. राजेंद्र बाऊस्कर (योग शिक्षक) यांच्या सौजन्याने देण्यात आला.
शिबिर यशस्वीतेसाठी स्काऊट-गाईड समिती प्रमुख व प्रमुख स्काऊट मास्टर श्री. वाय. जे. कुरकुरे, श्री. के. पी. चौधरी, क्रीडा शिक्षक श्री. जे. ए. चौधरी, श्री. एम. के. पाटील, गाईड कॅप्टन सौ. जयश्री चौधरी व सौ. नयना पाटील यांनी शिस्तबद्ध व हसत-खेळत शिबिर संपन्न करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी शिबिराचा अहवाल स्काऊट-गाईड जिल्हा कार्यालयास पाठविण्याचे ठरले.
तसेच कला शिक्षक श्री. एस. बी. सपकाळे, श्री. पी. सी. कचरे, श्री. एन. बी. चौधरी, श्री. एस. पी. पाटील, श्री. एन. ए. देशमुख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.