भुसावळ तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
भुसावळ | दि. 24 नोव्हेंबर 2025
भुसावळ तहसील कार्यालय येथे दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी ठीक 4.00 वाजता राष्ट्रीय ग्राहक दिन नायब तहसीलदार श्री हेमंत गुरव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात ग्राहक पंचायत महाराष्ट्र भुसावळ उपाध्यक्ष प्रतिनिधी श्री किरण बोलके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व विशद केले. सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून ग्राहकांना उत्तम प्रतीचे धान्य मिळणे हा ग्राहकांचा मूलभूत हक्क आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच ग्राहक प्रबोधनासाठी शहरातील दर्शनी भागात डिजिटल फलक लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
रस्त्यावर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, चव तसेच स्वच्छतेची तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. राष्ट्रीय ग्राहक दिन हा केवळ चार भिंतींत साजरा न करता, ग्राहकांना प्रत्यक्ष प्रबोधन होईल अशा मध्यवर्ती ठिकाणी किंवा गाव पातळीवर ग्रामपंचायत स्तरावर साजरा करावा, असे महत्त्वपूर्ण विचार त्यांनी व्यक्त केले.
यावेळी पुरवठा अधिकारी सौ. रेवतकर मॅडम, श्री सुयोग चौधरी (ग्राहक पंचायत सदस्य) हे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच श्री युवराज कुरकुरे (जिल्हा संघटक, रावेर विभाग) व श्री मिलिंद मांडळकर (जिल्हा संघटक, प्रवासी महासंघ) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर श्री युवराज कुरकुरे यांनी यावर्षीच्या “डिजिटल न्यायाद्वारे सक्षम व जलद तक्रार निवारण” या थीमवर आधारित सामूहिक ग्राहक प्रतिज्ञा उपस्थितांकडून वाचून घेतली. “चला, आपण सर्वजण ग्राहक हक्कांचे रक्षण करूया” असे आवाहन त्यांनी केले.