*भुसावळ पालिका रणसंग्राम* : माजी आमदार संतोष चौधरींना जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडेंचा 'चेकमेट'
भुसावळ : मुंबईतील वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष हाजी आशिक खान शेर खान यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला. आशिक खान यांनी शरद पवार गटाला दिलेली सोडचिठ्ठी भुसावळचे मजी आमदार संतोष छबिलदास चौधरी यांना मोठा धक्का मानला जातो आहे. मध्यंतरी त्यांनी अजित पवार गटाचे कार्यकर्ते फोडून आपल्या सोबत जोडले होते. मात्र आता माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी चौधरी यांचे निकटवर्तीय आशिक खान यांना आपल्या गटात आणून चेकमेट दिला आहे.
*भुसावळात ताकद वाढणार*
प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांचे पक्षात स्वागत करत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी आशिक खान यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रवेशामुळे भुसावळ आणि परिसरातील पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी भुसावळ शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढीभाऊ), रावेर लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.