भारतातील अनेक भागांमध्ये आजही मांडूळ जातीच्या सापाबाबत अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. ग्रामीण भागात विशेषतः महाराष्ट्रात या सापाला “डबलतोंडी”, “पैसा खेचणारा”, “शिवाचा साप” अशा संज्ञांनी ओळखले जाते. पण या सर्व समजुती अवैज्ञानिक व फसव्या आहेत.
मांडूळ साप, ज्याचे वैज्ञानिक नाव Eryx Johnii असे आहे, हा एक विषारी नसलेला साप आहे. तो आपल्या जाडसर व गुबगुबीत शरीरामुळे सहज लक्ष वेधून घेतो. या सापाच्या शेपटीचा भाग डोक्यासारखा दिसत असल्यामुळे त्याला "डबलतोंडी" सापही म्हटले जाते. यामुळे अनेक लोक त्याला चमत्कारी समजतात.
खरंतर, हा साप पूर्णतः निरुपद्रवी असून नैसर्गिक परिसंस्थेतील उपयुक्त घटक आहे. शेतीमध्ये होणाऱ्या उंदरांच्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्याचे काम तो शांतपणे करतो. मात्र, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अनेकजण त्याला पकडून ठेवतात, विक्रीसाठी चढ्या किंमतीला बाजारात विकतात किंवा मारून टाकतात जे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा आहे.
मांडूळ सापावरील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, वने विभाग यांच्यातर्फे जनजागृती मोहीमा राबविल्या पाहिजेत. माध्यमांनीही आपल्या भूमिकेतून समाजप्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे.
प्रत्येक सजीवाचा निसर्गात काही उद्देश असतो. मांडूळ साप हा शेतकरी सह सर्वांचा मित्र आहे, शत्रू नाही. त्याच्याबाबत गैरसमज दूर होणे ही काळाची गरज आहे.