डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे जागतिक घुबड जनजागृती दिन निमित्त परिपाठात घुबड या उपयुक्त व दुर्लक्षित पक्ष्याविषयी माहितीपर सादरीकरण करण्यात आले. क्रीडा शिक्षक जे. ए. चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना घुबडाचे पर्यावरणातील महत्त्व, त्याच्या विविध प्रजाती, उपयोग व अंधश्रद्धांमुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सविस्तर माहिती दिली.
चौधरी सरांनी सांगितले की, जगात सुमारे २०० हून अधिक घुबड प्रजाती असून भारतात त्यातील ३० प्रजाती आढळतात. घुबड हे शेतकऱ्यांचे खरे मित्र असून ते उंदीर व हानिकारक कीटकांचा नाश करून पीकसंवर्धनात मोलाचे योगदान देतात. अंधश्रद्धेमुळे घुबडाला दुर्भाग्याचे प्रतीक मानले जाते, मात्र खरेतर तो अत्यंत बुद्धिमान व संवेदनशील पक्षी आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक मा. डी. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग व जैवविविधतेबाबत सजग राहण्याचे व अंधश्रद्धांना दूर ठेवण्याचे आवाहन केले.