डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक १५, १६ व १७ मार्च रोजी तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असून, परीक्षेनंतरच्या सुट्टीचा सकारात्मक उपयोग करून अनुभवात्मक शिक्षणाचा लाभ देण्याचा शाळेचा हेतू आहे.
शिबिराचे उद्दिष्ट:
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य, सामाजिक जाण, नेतृत्वगुण व चारित्र्य विकास या अंगांनी घडवणूक करणे, तसेच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी करून देणे हे शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
शिबिराची व्याप्ती व स्वरूप:
कालावधी: तीन दिवस (१५ ते १७ मार्च)
वेळ: सकाळी ८:०० ते १२:३०
वयोगट: इयत्ता ५ वी ते ९ वी
मुख्य विषय व उपक्रम:
संवाद कौशल्य, आत्मविश्वास वृद्धी, ताणतणाव व्यवस्थापन, योग व ध्यान, सामाजिक मूल्यांचे शिक्षण, गटकार्य, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, विज्ञानविषयक खेळ, नवीन शैक्षणिक धोरणांची माहिती, पर्यावरणीय नैतिकता, निसर्गस्नेही जीवनशैली आदी विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी म्हणाले, “ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करताना त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे. भावी सुजाण आणि संस्कारी नागरिक घडवण्याचा हा निस्वार्थ प्रयत्न आहे.”
प्रत्येक सत्रात सहभागात्मक कार्यशाळा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांचे वयोगटानुसार गटवाटप करण्यात येईल. प्रभावी व अनुभवी मार्गदर्शक वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
शिबिर समाप्तीनंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना “संस्कारमाला शिबीर” प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी दिली. शाळेच्या सर्व शिक्षकांचे नियोजनात सहकार्य लाभत असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.