डी. एस. देशमुख विद्यालयात पाचवे व सहावे पुष्प यशस्वीरीत्या संपन्न
थोरगव्हाण (ता. रावेर) – डि. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे सुरू असलेल्या उन्हाळी संस्कारमाला शिबिराचे पाचवे व सहावे पुष्प अत्यंत प्रेरणादायी व भावनिक वातावरणात पार पडले. या दोन्ही सत्रांमधून विद्यार्थ्यांच्या मानसिक, सामाजिक व नैतिक विकासाला चालना देणारे मार्गदर्शन लाभले.
पुष्प ५वे – “मुलांच्या जडणघडणीत आईचे स्थान”
या सत्रात प्रमुख वक्त्या सौ. आरती सारंग चौधरी (समुपदेशक व समाजसेविका, भुसावळ) यांनी विद्यार्थ्यांना आईच्या भूमिकेचे महत्त्व सांगताना नमूद केले की – "आई हीच मुलांची पहिली गुरू असते. तिच्या सान्निध्यात संस्कार रुजतात. घरातील वातावरण व आईचे विचार यांचा मुलांच्या यशात मोलाचा वाटा असतो."
राजमाता जिजाऊ व साने गुरुजींच्या मातांचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात मातृत्वाबद्दलचा आदर जागवला. त्यांच्या भावनिक भाषणाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच व माजी विद्यार्थी श्री. सदाशिव झांबरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "आईच्या मार्गदर्शनामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. ग्रामीण भागातील मातांचाही मुलांच्या घडणीत मोलाचा वाटा असतो." आईची महती विशद करतांना त्यांनी आपल्या डोळ्यातील अश्रुंना वाट मोकळी करून दिली .
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. सरस्वती पूजन झांबरे सरांच्या हस्ते पार पडले. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी केले. वक्त्यांचा परिचय सौ. जे. पी. चौधरी यांनी करून दिला.
प्रमुख पाहुण्यांमध्ये सौ. सरिता गणेश पाटील, श्री. सारंग व्ही. चौधरी (आर्किटेक्ट, भुसावळ) व श्री. गणेश पाटील यांचा समावेश होता. संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष श्री. उमाकांत बाऊस्कर आणि संचालक श्री. रविंद्र काशिनाथ चौधरी यांचीही उपस्थिती लाभली. प्रभारी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर यांच्या दातृत्वातून विद्यार्थ्यांना स्वादिष्ट उपम्याचा अल्पोपहार देण्यात आला.
पुष्प ६वे – “संस्कार – काळाची गरज”
या सत्राचे प्रमुख वक्ते श्री. मनोज महाराज चौबे (नांदुरा) होते. आपल्या प्रभावी व संवादी शैलीत त्यांनी संत तुकडोजी महाराज रचित 'ग्रामगीता'चा संदर्भ देत श्रमसंस्कार, स्वच्छता, समाजसेवा, सद्वर्तन व ग्रामीण जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून दिले.
"ग्रामगीता हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक जागृती घडवणारा ग्रंथ आहे. गुणपत्रिका कितीही उज्ज्वल असली तरी आचार-विचारात संस्कार झळकले पाहिजेत," असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत जनार्दन चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले – "संस्कारमाला शिबिर हे विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मकतेचे बीजारोपण करणारे आहे. हे शिबिर म्हणजे नुसते मार्गदर्शन नव्हे, तर जीवनमूल्यांची दीपशिखा आहे."
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पवन हेमंतराव चौधरी (सचिव, द एज्युकेशन सोसायटी) यांनी सांगितले – "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नसून, नैतिकतेचे व जीवनमूल्यांचे शिक्षणही आवश्यक आहे. हे शिबिर विद्यार्थ्यांना जीवनात योग्य दिशा देणारे आहे."
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संतोषभाऊ सुरवाडे (पोलीस पाटील, करंजी), भागवत राव सनानसे (माजी विद्यार्थी, पुणे), कवी डी. एस. सोनवणे (माजी विद्यार्थी, 1964 बॅच, जळगाव) यांची उपस्थिती लाभली.
प्रभारी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. सी. कचरे यांनी समर्थपणे पार पाडले.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. उमाकांत वसंत बाऊस्कर, संचालक श्री. रवींद्र काशिनाथ चौधरी, तसेच श्री. वाय. जे. कुरकुरे, श्री. के. पी. चौधरी, श्री. जे. ए. चौधरी, श्री. एम. के. पाटील, सौ. जे. पी. चौधरी, श्री. एन. बी. चौधरी, सौ. एन. डी. पाटील, श्री. एस. बी. सपकाळे व श्री. एस. पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील लिपिक आर. ए. चौधरी, शिपाई योगेश झोपे व अक्षय तायडे यांचे सहकार्य लाभले.
ही दोन्ही सत्रे विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारांचे बीज रोवणारी, विचार जागवणारी आणि जीवनमूल्यांशी जोडणारी ठरली.
संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ यांनी उन्हाळी संस्कारमाला शिबिर यशस्वी संपन्न केल्या बाबत विद्यार्थी , पालक , आमंत्रीत सर्व चाहुणे महत्वाचे म्हणजे सर्व प्रभावी वक्ते यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे .