बदलत्या हवामानाचे परिणाम : कार्यशाळेत रमाकांत चौधरी यांचा सहभाग; पिंप्री-सेकम शेतकऱ्यांच्या व्यथा सादर
हवामान बदल व त्याचे परिणाम या विषयावर ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सौम्या दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक कार्यशाळा रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळील तारा येथील युसुफ मेहेरअली सेंटर येथे पार पडली. ही कार्यशाळा दिनांक ८ व ९ एप्रिल २०२५ रोजी जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM) च्या National Alliance of Climate and Ecological Justice (NACEJ) या राष्ट्रीय मंचाच्या महाराष्ट्र विभागातर्फे आयोजित करण्यात आली होती.
हवामान संकट आणि त्याचे परिणाम या विषयावरील या कार्यशाळेत NACEJ च्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणारे महाराष्ट्रभरातील पर्यावरणीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. औषिक वीज केंद्र दिपनगर याने बाधित गाव पिंप्रीसेकम संघर्ष समिती अध्यक्ष रमाकांत चौधरी यांचा उतर महाराष्ट्र विभागातून सहभाग होता औष्णिक प्रकल्पामुळे बाधित परिसरातील मानवी वस्त्या , शेती , जैवविविधता , प्राणी , पक्षी , वनस्पती यांच्या अन्नसाखडी व शेती उत्पादनात 40% येणारी घट याबाबत चर्चा करून व्यथा रमाकांत चौधरी यांनी मांडली .
कार्यकर्त्यांमध्ये हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करणे व या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांची क्षमता वाढवणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
या प्रशिक्षण कार्यशाळेत कार्यकर्त्यांमध्ये हवामान संकटासंदर्भात पर्यावरण व सामाजिक न्यायासाठी वैज्ञानिक हस्तक्षेप करण्याची क्षमता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. हवामान व वातावरण या वैज्ञानिक संकल्पनांची मूलभूत माहिती, तसेच त्या मोजण्याची प्रात्यक्षिके यांचा या प्रशिक्षणात समावेश होता.
विविध जनआंदोलनांमध्ये आणि पर्यावरणीय लढ्यांमध्ये सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते या संकल्पना समजून घेताना हवामानातील बदल मोजण्यासाठी विविध उपकरणांचा वापर करत होते, हे या कार्यशाळेचे खास वैशिष्ट्य होते.
दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत गंभीर हवामान स्थिती समजून घेणे, हवा, पाणी, ध्वनी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, आयोनायझिंग रेडिएशन इत्यादी प्रदूषणांचे निरीक्षण व मोजमाप, त्यासाठीचे सरकारी निकष, वापरण्यात येणारी मानके, दस्तऐवजीकरण, तसेच प्रदूषण स्रोत व दायित्व निश्चित करण्याच्या पद्धती यांची माहिती देण्यात आली.
हवामान बदलाच्या संकटाचा उपेक्षित समाजाच्या उपजिविकेवर व आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचीही चर्चा झाली. असुरक्षित समुदायांना जोखीम कमी करण्यात आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठी तसेच हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सोपे उपाय कसे राबवता येतील, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
हवामान बदल, पर्यावरण आणि सामाजिक न्याय यांचा परस्परसंबंध कार्यशाळेतील चर्चांतून अधोरेखित करण्यात आला. या संपूर्ण प्रशिक्षणात डॉ. सौम्या दत्ता यांनी मार्गदर्शन केले.
NACEJ चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संतोष ललवाणी यांनी 'तेरी' या संस्थेने तयार केलेला ‘महाराष्ट्र स्टेट ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज’ हा अहवाल संक्षेपात सादर केला. अशा प्रकारच्या अभ्यास अहवालांची गरज अधोरेखित करत NACEJच्या वतीने भविष्यात संशोधक टीम तयार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
कार्यशाळेचा समारोप NACEJ-महाराष्ट्र तर्फे पुढील राज्यव्यापी कृतींच्या कालबद्ध नियोजनासह करण्यात आला. हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी तळागाळातील समाजात काम करणारे आणि जनआंदोलनांना वैज्ञानिक डेटा पुरवणारे सजग कार्यकर्ते तयार करण्याची गरज डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी समारोपप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये अशा कार्यशाळा आयोजित करण्याचे नियोजनही उपस्थित प्रतिनिधींच्या सहकार्याने करण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य समन्वयक सुजय मोरे यांनी विशेष मेहनत घेतली.