सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
अंतुर्ली बु. तालुका भडगाव येथील लोकनियुक्त सरपंच उषा भाईदास कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नसल्याने या कारणावरून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. सन 2022 मध्ये उषा भाईदास कोळी हे अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गावर लोकनियुक्त सरपंच पदी निवडून आल्या. उषा भाईदास कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही म्हणुन सौ.छायाबाई संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला होता.त्यावर सुनावणी होऊन त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी आदेश जारी केले.उषा भाईदास कोळी ह्या सन 2022 मध्ये ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच अनुसूचित जमाती या राखीव जागेवर निवडून आलेल्या होत्या त्या दिवसापासुन त्या सरपंच पदावर कार्यरत होत्या.
सरपंच पदाची जागा महिला अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते.मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. तक्रारदार छायाबाई संजय गायकवाड यांच्यातर्फे ॲड. रणजित पाटील कनाशीकर यांनी कामकाज केले.