वरणगाव बसस्थानक तिरंगा चौक अतिक्रमणाच्या विळख्यात . (शाळा सुटल्यावर अपघाताची शक्यता . अतिक्रमण काढण्याची सुज्ञांची मागणी )
वरणगांव शहरातील बस स्थानक चौकात भव्य तिरंगा ध्वज उभारून चौक सुशोभिकरण करण्यात आला . परंतु चौकातील वाहतुक कोंडीची समस्या जैसे थे असुन चौक चहुबाजुंनी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असुन येथे अतिक्रमण धारकांची चढाओढ सुरु झाली आहे .
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानक चौकात १०५ फुटावर तिरंगा ध्वज उभारण्यात आला असुन बस स्थानक चौकाचे सुशोभिकरण करून त्याचे तिरंगा सर्कल नामकरण करण्यात आले आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असून चौकाचे झालेले सुशोभिकरण, प्रवाशांना बसण्यासाठी प्रवाशी निवारा तसेच नागरीकांना बसण्यासाठी नगर परिषद व आमदार निधीतुन ठेवण्यात आलेले बाक यामुळे या सर्कल परिसरातील नागरीक सकाळ संध्याकाळ चौकात येवुन बसत असल्याने या चौकातील वर्दळ वाढली आहे . त्यातच पाचही भागाकडचे प्रवाशी निवारे अतिक्रमण धारकांनी कब्जात घेतली आहेत .याच संधीचा फायदा घेऊन येथे पानठेले चहाटपरीवाले 'फळ, भाजीपाला व इतर साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटला आहे. त्यांनी आपसात जणुकाही अतिक्रमण करण्याची व चौक व्यापण्याची चढाओढ सुरु केली आहे . तसेच भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड व गावात जाणाऱ्या ऑटो रिक्षा बसेसचीही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या सर्कल मध्ये दिवसभर प्रवाशांची व इतर नागरीकांची वर्दळ असते. यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी व लहानमोठ्या किरकोळ अपघाताच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत . त्यामधे शहरातील मोकाट गुरांची भर पडली आहे. हि गुरे (गोधन )दिवसा ढवळ्या सर्कल लगत जणुकाही खाजगी गोठा समजुन ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडली आहे .
तरी संबंधीत विभागाने किमान सर्कलच्या चारही बाजुंचे अतिक्रमण काढून सर्कलला मोकळा श्वास घेऊ द्यावा . व नागरिकांना सर्कलजवळून रस्ता ओलांडण्या साठी सुरक्षित रस्ता मोकळा करून द्यावा तसेच शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमण हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे याकडे नगर परिषदेने लक्ष देण्याची गरज आहे परंतु नगरपरिषद ही धृतराष्ट्राच्या भूमिकेत दिसून येत आहे अशी मागणी सुज्ञांनी केली आहे .