Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे रेल्वे कर्मचाऱ्याचा खुन

भुसावळात पुन्हा खळबळ! रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या; संशयित ताब्यात
भुसावळ, दि. 4 (प्रतिनिधी):
भुसावळ शहरात सलग चार दिवसांच्या आत दुसऱ्यांदा खुनाची घटना घडल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रेल्वेच्या फिल्टर हाऊसमध्ये कार्यरत असलेल्या प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय 58, रा. स्टार लॉन, भारंबे नगर, भुसावळ) यांची डोक्यात लोखंडी पट्टीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी (4 जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.
या प्रकरणी आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर, भुसावळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
भंगार चोरीच्या वादातून हत्येचा संशय
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तताटे नगराजवळील रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये प्रसाद कुलकर्णी हे कर्तव्यावर असताना संशयित आकाश गोरखा तेथे आला. दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयिताने फिल्टर हाऊसमध्ये पडलेली लोखंडी पट्टी उचलून कुलकर्णी यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापत व अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासात हा वाद भंगार चोरीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आरोपीवर पूर्वीचे गुन्हे
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा मनोरुग्ण असून त्याच्यावर ठाणे येथे उपचार सुरू असल्याचे समजते . त्याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले होते. मात्र, सन 2021 नंतर त्याच्याविरुद्ध कोणताही नवीन गुन्हा नोंद झालेला नव्हता.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले, शहर पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तसेच जळगाव येथून फॉरेन्सिक व ठसे तज्ज्ञांच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
शहरात भीतीचे वातावरण
अवघ्या चार दिवसांच्या आत भुसावळात दुसऱ्यांदा खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.