Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


तपत कठोरा येथे डंफरच्या धडकेने वृध्दाचा मृत्यु



मुरूमाच्या डंपरखाली शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून डंपर पेटविला
तपत कठोरा येथील घटना

भुसावळ तालुक्यातील कठोरे बु. शिवारात मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामादरम्यान झालेल्या भीषण अपघातात ५५ वर्षीय शेतकरी अनिल मुकंदा पाटील यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासोबत असलेली चार वर्षीय नात परी कौस्तुभ पाटील हिचा सुदैवाने जीव बचावला. घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावून तीव्र संताप व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पाणंद रस्त्याच्या कामासाठी मुरूम वाहतूक करणारा एमएच-१९-ईयू-३७३७ क्रमांकाचा डंपर मागे घेत असताना दुचाकी (एमएच-१९-बीएफ-९३२०) वर थांबलेल्या अनिल पाटील यांना जोरदार धडक बसली. डंपरखाली सापडल्याने ते काही अंतर फरफटत गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित डंपरला आग लावल्याने वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी संयम राखत जमाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वरणगाव नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचेपर्यंत पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली.
दरम्यान, कठोरे परिसरात अनेक दिवसांपासून मुरूम वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अवजड वाहनांची सततची ये-जा होत असतानाही सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपघात घडण्यापूर्वीही अशा वाहनांमुळे धोका निर्माण होत असल्याबाबत वारंवार चर्चा होत होती, असे स्थानिकांनी सांगितले.
अपघातानंतर पसार झालेल्या चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या असून अपघात व जाळपोळ प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महसूल यंत्रणेच्या चौकशीची मागणी
एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव गेल्यानंतर केवळ वाहन चालकावर कारवाई करून हा विषय संपवू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. मुरूम उत्खनन, वाहतूक, देखरेख तसेच संबंधित महसूल आणि प्रशासकीय यंत्रणेच्या भूमिकेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.