थोरगव्हाण अंगणवाडी येथे पोषण माह कार्यक्रम उत्साहात संपन्न
अंगणवाडीच्या वतीने स्तुत्य प्रबोधन कार्यक्रम— “सुपोषित बालक – सशक्त भारत” या घोषवाक्याला अनुसरून संपूर्ण देशभर ११ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत पोषण माह विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जातो. महिलांमध्ये व बालकांमध्ये पोषणाची जागरूकता निर्माण करून कुपोषणमुक्त समाज घडविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर थोरगव्हाण येथील अंगणवाडीत पोषण माह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डी. एस. देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. आशाताई सुपडू मोरे यांची विशेष उपस्थिती लाभली.
पोषण माह उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी व बालकांसाठी संतुलित आहाराचे महत्त्व, आरोग्यविषयक मार्गदर्शन, तसेच गर्भवती व स्तनदा मातांची योग्य काळजी या विषयांवर प्रबोधन करण्यात आले. लहान मुलांमध्ये कुपोषण रोखण्यासाठी माहितीपर उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विविध धान्य व कडधान्यांचे स्टॉल लावून ग्रामस्थांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.
अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्यांनी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करून पोषणमूल्य असलेल्या सकस आहार व फळांचे स्टॉल लावून ग्रामस्थांमध्ये पोषणाविषयी जागरूकता निर्माण केली. या उपक्रमास ग्रामस्थ व मातापालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकांनी स्टॉलना भेट देऊन पोषणाविषयीची माहिती आत्मसात केली.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व परिश्रम अंगणवाडी सेविका भगिनी मंगला पाटील, नलिनी शिंदे, शकुंतला पाटील, सुनंदा तायडे तसेच मदतीस अनिता तायडे, लता तायडे, आरती तायडे, रंजना कंखरे यांनी केले.