थोरगव्हाण :
वन्यजीव सप्ताहाच्या (१ ते ७ ऑक्टोबर) निमित्ताने निसर्गप्रेमींसाठी आनंदाची घटना घडली. दि. ८ ऑक्टोबर रोजी थोरगव्हाण येथील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक वानर अनपेक्षित पाहुणा म्हणून दाखल झाले.
गावकुसावर आलेल्या या वनातील पाहुण्याचे दर्शन घेण्यासाठी लहान मुले, तरुण व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी झाली. अन्न व पाण्याच्या शोधार्थ वानर गावाकडे वळतात, आणि त्यामुळे त्यांचे आगमन हा नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरतो.
सकाळच्या प्रार्थना सत्रादरम्यान विद्यालयाच्या पूर्वमुखी द्वारावर, विद्येचे महत्त्व सांगणाऱ्या घोषवाक्याजवळ हे वानर बसले होते. शालेय परिसर निरखत बसलेल्या वानराचे दर्शन विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कुतूहलाने घेतले.
अलीकडे वन्यप्राणी गावात दिसणे दुर्मिळ झाले आहे. काही वेळा वानरांच्या टोळ्यांमध्ये संघर्ष होऊन काही जखमी होतात, त्यामुळे शांत स्वभावाचे वानर एकटे पडून गावाच्या परिसरात येतात, असा अनुभव ग्रामस्थांनी व्यक्त केला.
वन्यजीव सप्ताहाचा समारोप विद्यालयात करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय हरितसेना समितीच्या वतीने वन्यप्राणी संरक्षण व संवर्धनाबाबत माहिती देण्यात आली तसेच वनसंपदा जपण्याचा व वन्यजीवांचे रक्षण करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
या अनोख्या प्रसंगामुळे देशमुख विद्यालयात आणि थोरगव्हाण परिसरात “वनातील पाहुण्या वानरा”ची चर्चा रंगली आहे.