रावेर येथील वाहतूक विभागाच्या पुढाकाराने लवकरच आयोजित होणाऱ्या मार्गदर्शन शिबिराची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे.
या शिबिरात सर्वप्रथम ज्या ठिकाणी वाहतूक समस्या जाणवते व वाहनांचा थांबा असतो अशा जागांची निवड केली जाईल. रस्त्याच्या बाजूला वाहतूक नियमांची माहिती देणारे बॅनर लावले जाणार आहेत. तसेच वाहन चालकांना मार्गदर्शनासाठी आवश्यक पुस्तके एनजीओ तर्फे स्वखर्चाने उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
ड्रायव्हिंगचे नियम, सुधारित ड्रायव्हिंग पद्धती, नवीनीकरण, वाहन कायदे, तसेच चालकांमध्ये होणारे समज-गैरसमज याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. शिबिरात सुरक्षा कर्मचारी, मार्गदर्शक यांची नेमणूक होणार असून, कार्यकर्त्यांना गणवेश देण्यात येईल.
कार्याची जबाबदारी वाहतूक निरीक्षक श्री. टी. एस. पाटील, तसेच मार्गदर्शक श्री. महेश भारती आणि श्री. राजेंद्र आत्माराम गवारे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांचे भान वाढून सुरक्षिततेबाबत जनजागृती होईल, असा आयोजकांचा विश्वास आहे.