डिजिटल युगात झपाट्याने वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांमुळे समाजात सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर Quick Heal Foundation (QHF) व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (KBCNMU) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या QHF Cyber Warrior Club च्या वतीने थोरगव्हाण येथील शाळेत सायबर सुरक्षा जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात सायबर वॉरियर स्वयंसेवक देवेंद्र कापडे आणि भावेश कोळी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, सोशल मीडियावरील फसवणूक, सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा, फिशिंग अटॅक ओळखण्याचे उपाय, आणि सायबर कायदे याविषयी सखोल माहिती दिली.
स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष उदाहरणे आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना सायबर सजग नागरिक बनण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी भूषवले. त्यांनी नव्या पिढीला डिजिटल साक्षरतेसोबतच सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे महत्व सांगितले. यावेळी टी. पी. घुले, वाय. जे. कुरकुरे , एस बी सपकाळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल QHF Cyber Warrior Club व KBCNMU जळगाव यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.