कृषि विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे, अनुसूचीत जाती उपयोजने अंतर्गत गुरांचे आरोग्य आणि पोषण व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन.
अमरावती दि. (प्रतिनिधी) : भारत हा कृषिप्रधान देश असून भारताला कृषी प्रधान बनविण्यात भारतीय गोवंशाचे योगदान मोलाचे आहे. आपल्या देशात गायीला माता संबोधण्यात येते आणि पुराण युगापासून इतिहासाचा आढावा घेतला तरी आपणास आपल्या गोवंशाच्या अनेक कथा बघावयास मिळतात. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक देवीदेवतांची आणि राजा महाराजांची नावे गोवर्धन, गौतम अशी आढळून येतात. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशाच्या अन्नधान्याची गरज म्हणून आपण रासायनिक खताचा वापर वाढविला.
परिणामी सेंद्रिय शेती कमी झाली आणि त्यामुळे गोधन कमी झाले. वर्तमान परिस्थितीत जागतिक स्तरावर सेंद्रिय शेतीला आणि शेतमालाला प्रोत्साहन दिले जात असून, यासाठी गोवंशाची गरज अनिवार्य ठरली आहे. याचा विचार करूनच केंद्रीय पशु संशोधन संस्था कार्य करीत असून, मानवाच्या सुदृढ आयुष्यासाठी शेतकऱ्यांनी ‘हर घर गाय’ ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केंद्रीय पशु संशोधन संस्था मेरठ चे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. एस. के. वर्मा यांनी केले. ते कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर आणि केंद्रीय पशुसंशोधन संस्था मेरठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत गुरांचे आरोग्य आणि पोषण व्यवस्थापन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिंह, कृषी विस्तार विषय विशेषज्ञ प्रताप जायले, पशु विभाग विषय विशेषज्ञ महेश आखूड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. वर्मा म्हणाले की, आम्ही आपल्या भागातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प घेतला असून. अनुसूचित जातीच्या पशुपालनाला सहाय्यता करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवित आहोत. त्यामध्ये जनावरांची संख्या वाढवून दुग्धाचे उत्पादन वाढविणे, पशूपालकांना बारमाही चारावान देवून चार्यााचे दुर्भिक्ष समाप्त करणे, गायीच्या शेणापासून गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, जनावरांना औषधी आणि लसी पुरविणे तसेच आमच्या कडील फ्रीजवाल जातीच्या वळूचे सीमन देऊन आपल्याकडील गायीच्या वंशातून अधिक दुग्धोतपादन देणाऱ्या वंशाची निर्मिती करणे. हा महत्त्वाचा उद्देश या कार्यक्रमाचा आहे. फ्रिजवाल हे आमचे संशोधन असून या वंशाची गाय प्रतिदिन सरासरी १३ ते १४ लिटर दुग्ध देते. त्यामुळे पशुपालकाचे उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही मध्ये वाढ होऊन पशुपालकाचे जीवनमान उंचावण्यास मोलाचे ठरते असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना डॉ. सिंह म्हणाले की, संपूर्ण देशाचा कल जैविक आणि सेंद्रिय शेतीकडे वाढत चालला आहे. शेतीतील रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी शेणाचे महत्त्व आहे आणि त्यासाठी जनावरांचे असणे अनिवार्य आहे. एखादी योजना येते आणि जाते त्याचा परिणाम केवळ कागदोपत्री पूर्ततेवर दिसून येतो. मात्र कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर हे शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरले आहे. आपण केवळ ही योजना घेऊन चालणार नाही तर या योजनेचे एक मॉडेल देशासाठी उभे झाले पाहिजे. या योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर आपण बारकाईने लक्ष केंद्रित करून भविष्यात हे मॉडेल देशासाठी उत्कृष्ट मॉडेल म्हणून विकसित करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महेश आखूड यांनी प्रस्तावित योजने संदर्भात समोचीत माहिती देऊन ही योजना निश्चित शेतकऱ्याची दशा आणि दिशा बदलेल असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना गांडूळ खत, पशुपयोगी औषधी, प्रथमोपचार पेटी आणि बारमाही चारा रोपाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप जायले यांनी केले तर महेश आखूड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रफुल्ल महल्ले, डॉ. हर्षद ठाकुर, राहुल घोगरे, आकाश धरमकर, सुरेश वैद्य, आरती वर्मा, कैलाश शेखावत, ज्ञानेश्वर जिराफे, संजय घरडे, सचिन पिंजरकर, प्रणाली देशमुख, अक्षय गणेशपुरे, डॉ. विशाखा पोहरे, अश्विनी रंगे, ऋषिकेश शिंदे, महेंद्र सेंगर, राहुल जगताप, उमेश तायडे, विशाल राऊत, विशाखा राणोटकर, निशा राठोड, श्याम भुरके, आशीष रंगारी, शुभम रेवस्कर, वैशेष पळसापुरे, सिद्धार्थ गडलिंग यांनी विशेष परिश्रम घेतले.