भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे राहणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटर सायकलला धडक दिल्याने दुचाकी वरील बावीस वर्षीय तरुण जागीच मृत्यू झाला आहे तर सोबतचा एक जण किरकोळ जखमी झाल्याची दुदैवी घटना शनिवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी गावाजवळ घडला आहे.
या घटनेमुळे साकेगावात शोककळा पसरली आहे. तुषार महेश बाऊस्कर वय -२२, रा. साकेगाव तालुका भुसावळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील हनुमान मंदिरात दर शनिवारी हजारो भाविक दर्शनासाठी जात असतात. साकेगाव येथील तुषार बाऊस्कर आणि त्याचा नातेवाईक पंकज धनराज पाटील वय-२५, याच्यासोबत शनिवार रोजी दुपारी दुचाकीने दर्शनासाठी दोघे जण गेले होते.
दरम्यान दुपारी दर्शन घेतल्यानंतर दोघे जण मुक्ताईन गर मार्गे दुचाकीने घरी परतत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथे मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत तुषार बाऊस्कर हा तरुण जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला पंकज पाटील हा किरकोळ जखमी झाला आहे
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुक्ताई नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला आहे
या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे .
दरम्यान अपघाताची वृत्त साकेगावात धडकताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले आहे
तुषार बाऊस्करचे आधीच आई-वडिलांचे निधन झालेले आहे. तो आजी व काकांकडे भाऊ विनय सोबत राहत होता. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे साकेगाव व परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.