वरणगांव फॅक्टरी मधील रायफल चोरी प्रकरणी तीन आरोपी एटी एस व वरणगांव पोलीस यांच्या संयुक्त पथकाच्या ताब्यात
भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील शस्त्रागारातुन ए.के.४७ च्या ३ व ५.५६ च्या २ या बंदुका चोरी झाल्या होत्या.
एल सी बी पोलिसांनी ३ बंदुका जाडगाव जवळ रेल्वे रुळावरून २ ८ ऑक्टोबर हस्तगत केल्या होत्या.
ए.टी.एस. व वरणगांव पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव , सहायक फौजदार श्रावण जवरे व पो हे कॉ बनसोडे यांच्या पथकाने गुन्ह्याचा उलगडा केला असून उर्वरित २ बंदुकांसह तिघांना अटक केली आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा गुन्हा मानला जात होता.
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील शस्त्रागारातुन दि.१९ ऑक्टोबर ते दि.२१ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वरणगांव शस्त्रागारातुन सील तोडुन तसेच कुलूप व कडी कोयंडा तोडुन शस्त्रागारातील ए.के.४७ ३ व ५.५६ चे २ या बंदुका चोरून नेले होते.
त्यावरून वरणगाव पोलीस स्टेशन ला येथे चव्हाण यांच्या फिर्यादी वरून गु.र.नं.१९७/२०२४, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अति महत्वाचा असल्याने आरोपीचा शोध घेवुन चौकशी करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ए.टी.एस.प्रमुख, ए.टी.एस.चे आय.जी. व पोलीस अधीक्षक यांनी ए.टी.एस. नाशिक युनिटचे प्रभारी अधिकारी व जळगांव कॅम्पचे ए.टी.एस.पथक तसेच ए.टी.एस.चा तांत्रीक विभाग यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार ए.टी.एस.पथक हे दि.२३ ऑक्टोबरपासुन वरणगांव येथे ठाण मांडून बसले होते व गुन्हयाची बारकाईने व कसोशीने चौकशी करीत होते.
त्यादरम्यान चोरी झालेल्या बंदुकापैकी दि.२८ ऑक्टोबर रोजी जाडगांव जवळील रेल्वे रूळावर ३ बंदुका बेवारस स्थितीत मिळुन आल्या होत्या. तसेच गुन्हयातील चोरी गेलेल्या दोन रायफली व आरोपी अदयापपावेतो मिळुन आलेले नव्हते.
दि.०४/११/२०२४ रोजी पोलीस रेकॉर्डवरील आरोपींची माहिती काढुन ए.टी.एस. पथकाने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन, गुन्हा प्रकटीकरणाचे कौशल्य वापरून यातील आरोपी नामे लिलाधर उर्फ निलेश बळीराम थाटे, वय ४३ वर्षे, व्यवसाय शेती व प्लॉट खरेदी/विकी एजंट रा.तळवेल ता. भुसावळ जि. जळगांव याचेकडे कसुन चौकशी केली असता सदर आरोपी याने गुन्हा केल्याचे कबुल केले.
त्याला याकामी सहकार्य करणारे तुषार पाटील राहणार काहूरखेडा व ललीत थाटे या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे
संशयीत आरोपीने ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगांव येथुन चोरीस गेलेले शस्त्र ए के ४७ व ५ .५६ हे पोलीसांकडे जमा केले.
गुन्हयातील यापुर्वी बेवारस स्थितीत जाडगांव रेल्वे रूळावर मिळुन आलेल्या ३ रायफली हया देखील त्यानेच रेल्वे रूळावर टाकुन दिल्याचे कबुल केले आहे. गुन्हयातील आरोपी व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल तसेच गुन्हयात वापरलेला मोबाईल हे सहा.पोलीस निरीक्षक, वरणगांव पोलीस स्टेशन यांचेकडेस जमा केले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास जळगांव जिल्हा पोलीस करीत आहेत .
या घटनेत भिंतीवरून दोराच्या सहायाने फॅक्टरी मध्ये जावून आरोपी यांनी चोरी केली असल्याने डी एस सी जवांना च्या ताब्यात असलेल्या व चोवीस तास निगराणी ठेवणाऱ्या सुरक्षा यंत्रणे बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे .